चार हजार रुपयांची लाच, चौघे एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l अतिक्रमण नियमाकूल झाल्यानंतर अद्ययावत उतारा देणेकामी ४ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकारीसह त्यांना प्रोत्साहन देणारे सरपंच पती, रोजगार सेवक व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही घटना धुळे तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत फागणे येथे घडली.
मौजे ग्रामपंचायत फागणे येथे मालमत्ता क्र. ६५१ , मिळकत क. २०२५. क्षेत्र ४५० चौ. फुटाचे सरकारी जागेत तक्रारदार यांनी अतिक्रमण करून घर बांधलेले आहे. सदर घराच्या नमुना नं.८ उताऱ्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असुन भोगवटादार म्हणुन तक्रारदार यांचे नावाची नोंद आहे. त्यांनी शासकिय जागेवर केलेले अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आले आहे. परंतु त्यांचे घराचे नमुना नं.८ च्या उताऱ्यावर मालकी सदरात अदयाप सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्याने त्यांना सदर जागेवर बँकेकडुन गृहकर्ज मंजुर होत नाही. अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होवुन अदयावत नमुना नं.८ घराचा उतारा मिळणे करीता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील व सरपंच पती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय, फागणे येथे जावुन भेट घेतली. मात्र त्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या नमुना नं.८ वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अदयावत उतारा देणे करीता तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दि. १५ जुलै रोजी समक्ष येवुन दिली होती.
लाच लुचपत विभागाने दि. १६ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सरपंच पती नगराज पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांना ४ हजार रु. लाच देण्याकरीता प्रोत्साहन दिले. तसेच दि. १८ जुलै रोजी ग्रामविकास अधिकारी भाउसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ४ हजार रुपये लाचेची मागणी केली.
सदर लाचेची रक्कम लिपीक किरण शाम पाटील यांचे हस्ते स्विकारल्याने भाउसाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी, सरपंच पती नगराज पाटील, लिपीक किरण शाम पाटील व रोजगार सेवक पितांबर पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरुध्द धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच, राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.