बनावट नवरी शी लग्न लाऊन ३ लाखात फसवणूक, बनावट नवरी सह एजंट,नवरीचे मामा, आई, भाऊ या बनावट टोळीला अटक
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका नवऱ्या मुलाला बनावट नवरी मुलगी दाखवून त्या बनावट नवरीशी त्याचे लग्न लावून नवऱ्या मुलाकडून ३ लाखा रुपये उकडून लग्न लागल्या नंतर फसवणूक करून फरार झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. ही नवरी अल्पवयीन असल्याचेही उघड झाले.
धुळे येथील चाळीसगाव रोड परिसरात राहणारे ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी हे त्याच्या लग्नाकरीता मुलीच्या शोधात असतांना एजंट मोरे यांनी बनावट नवरी मुलीचा फोटो चौधरी यांच्या मोबाईल वर पाठविला. सदर मुलगी पसंत आल्याने दिनांक २० ऑगस्ट रोजी फिर्यादी व त्याचे नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. तेथे त्यांना फोटो मधली बनावट नवरी मुलगी दाखविण्यात आली. यावेळी नवरीचे सर्व बनावट नातेवाईक देखील हजर होते. त्यानंतर दि. २२ रोजी एजेंट मोरे हा फिर्यादी ज्ञानेश्वर चौधरी यांचे घरी गेला.व त्यांना सदर मुलीला दुसरे स्थळ आले आहे असे खोटे सांगून, जर तुम्हाला या मुलीशी लग्न करायचे असेल तर आता ताबडतोब तीन लाख रूपये द्या, अशी मागणी करत घाबरवण्याचा प्रयत्न केला . त्यानुसार ज्ञानेश्वर चौधरी यांच्या वडिलांनी लग्नासाठी ३ लाख रूपये गोळा करून दिले. त्यानंतर दि. २३ ऑगस्ट रोजी फिर्यादी चौधरी व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, येथे गेले. तेथुन बिजासनी माता मंदिर येथे हिंदु रिती रिवाजा नुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर त्यांचे लग्न लावण्यात आले.
लग्न करून व-हाड बनावट नवरी मुलगी व नवरीची आई यांचेसह घरी परत येत असतांना धुळे तालुक्यातील सोनगीर येथे हॉटेल स्वागत मध्ये जेवणासाठी थांबले. याच संधीचा फायदा घेवून बनावट नवरी व तिची आई हे बाथरूमला जाण्याचा बनाव करून हॉटेलच्या बाहेर गेल्या व अज्ञात इसमाचे मोटार सायकलवर बसून पळून गेल्या. ज्ञानेश्वर चौधरी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या संदर्भात चौधरी यांनी धुळे येथील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याची सर्व माहिती घेतली. तसेच या गुन्ह्यात अन्य जिल्ह्यातील तसेच दुसऱ्या राज्यातील आरोपी देखील सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी एक पथक गठीत करून तपासाला चालना दिली. सपोनि बोरसे यांनी दोन तपास पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. आरोपी हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात लपण्याचे ठिकाण बदलत फिरत असल्याचे तपासात समोर मात्र शेवटी पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेवून सुनिल पदमसिंग चव्हाण, रा. दुधखेडा, ता. शहादा, (बनावट नवरी मुलीचा भाऊ), नसीम मुजफ्फर खान पठाण, रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा (एजंट) ,भागाबाई बळीराम गवळी, रा. रायसिंगपुरा नंदुरबार, (बनावट नवरी मुलीचा आई), नादरसिंग उर्फ महाराज भंटूसिंग रावत (पावरा), ( बनावट नवरी मुलीचा मामा) यांना अटक केली. व बालिका (बनावट नवरी मुलगी) हीस ताब्यात घेवून रिमांड होम येथे जमा करून इतर आरोपींकडून अपहारीत रक्कम व एक मोटार सायकल जप्त केली आहे.
या बाबत अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता यात आणखी नावे पुढे आली. त्यात साईबाई बाद-या पावरा, रा. मानमोडया, ता. शहादा, संजय रामा भिल, रा. दुधखेडा, ता. शहादा, जलनसिग प्रेमसिंग मोरे, रा.नांदया, ता. शहादा यांचादेखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलीस पथक या आरोपींच्या मागावर असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले.