राज्यात गारपीट व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुढील ४८ तास महत्वाचे
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून अधून मधून पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गारपिटीचा देखील इशारा देण्यात आला आहे.तर दुसरीकडे विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून विदर्भात देखील गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबत प्रती तास ३० ते ४० किमी वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागानं म्हटलं आहे.
तसेच हवामान विभागाकडून अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, आकोला, लातूर, नंदूरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या सह काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार शक्यता आहे. तसेच मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.