राज्यातील या जिल्ह्यात पडणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात काही ठिकाणी पावसाने थोडी उघडीप दिली असली तरी मात्र काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मात्र पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच सोमवार पासून सलग तीन दिवस पाऊस उघडीप देणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी राज्यातील १३ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. . या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
तसेच पुणे ते रायगडच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुण्यात येत्या दोन दिवसात मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली तसेच रायगड,पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे.
आयएमडीने महाराष्ट्रासह तब्बल २२ राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही भागात पावसाचा ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
जम्मू आणि काश्मीर आणि लडाख, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, गोवा, मुंबई, मध्य महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, केरळ आणि आसामसह सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आयएमडीच्या मते, आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा