जळगाव शहर पुन्हा गोळीबाराने हादरले !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : शहराच्या के.सी. पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत 27 जुलैच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी शिवाजी नगरातच लहान मुलांच्या भांडणातून एका गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना उघड झाली होती. यानंतर पुन्हा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच के.सी. पार्क परिसरात घटना घडली आहे. शुभम माने हा वाळू व्यावसायिक राहतो. आज रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्याला खंडणी मागितली. त्याला वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र ते समोर न आल्याने टोळक्याने खालूनच एकदा गोळीबार केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्या. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले.
जळगाव शहर पोलिस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा आदींच्या पथकासह अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत आदींनी आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी दोन ते तिन वेळा गोळीबार झाल्याचे दिसून आले आहे. जुन्या वादातून अज्ञात इसमांनी हा प्रकार केल्याचे म्हटले जात आहे. या घटनेत सुदैवाने कुणी जखमी झाले नसून गोळीबारासह दगडफेक करणा-यांचा शोध सुरु आहे.