राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी गिरीश महाजनांची वर्णी? दिल्लीत हालचालींना वेग
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभेचा निकाल महायुतीला निराशाजनक लागल्याने निकालानंतर राज्यातील भाजपमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात असून जबाबदारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. जर फडणवीस राजीनाम्यावर ठाम राहिले तर भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागू शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील घरी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली असून राजीनामा देण्यावर ते ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी नेमकी कुणाला मिळेल अशा चर्चां राज्यात रंगू लागल्या असताना भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस नंतर दुसऱ्या स्थानी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राचे संकट मोचक म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक संकट काळात पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.