जळगाव मध्ये साडे पाच कोटींचे सोने – चांदी चारचाकी वाहनातून जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका वाहनातून ५ कोटी ५९ लाख ६१ हजाराचे सोने-चांदी जप्त करण्यात आले. पुणे येथून जळगावात येणाऱ्या एका चारचाकी वाहनातून शुक्रवारी रात्री रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत असून
आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी संपूर्ण प्रक्रिया करून हा साठा कोषागार कार्यालयात पाठविला आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. त्या पाठोपाठ रात्री रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस नाकाबंदी करीत असताना पुणे येथून येणारे एक वाहन क्र. एमएच १२. यएम ५६२० हे अडविण्यात आले असता पोलिस पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात जवळपास ४ किलो सोने व ३४ किलो चांदी आढळली.
याचा पंचनामा पोलिस उप विभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला असून इन कॅमेरा सर्व प्रक्रिया करण्यात आली. हे वाहन पुणे येथून सोने-चांदी घेऊन जळगावात येत होते. जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य २ असे एकूण ३ सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने हा साठा जप्त करण्यात आला आहे.