सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील “त्या” सदस्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील (DPC) सदस्याच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. तात्काळ या सर्व नियुक्त्या रद्द कराव्यात असे आदेश नियोजन विभागाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या संदर्भात राज्य सरकारचे उपसचिव नितीन खेडकर यांंनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या निर्णय झाल्याच्या क्षणापासून रद्द करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक होत असते. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार हे नियोजन समितीचे सदस्य असतात. आमदार, खासदार यांच्या शिफारसीनुसार विशेष निमंत्रित सदस्यांची नेमणूक केली जाते.
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीत (DPC) निधीचे नियोजन केले जाते. नियोजन समितीच्या बैठकीत कोणाला किती निधी द्यायचा, हे ठरवले जाते.
नवीन सरकार आल्यानंतर सर्व जिल्ह्यात नविन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या नियुक्ती केली जाते. आता आमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आता केवळ आमदार आणि खासदारांनाच बसता येणार आहे. मात्र, त्यांच्या शिफारसीनुसार येणाऱ्या विशेष निमंत्रित सदस्यांना या बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. नविन नियुक्त्या होईपर्यंत सदस्यांना बैठकींना बसता येणार नाही.