Breaking : अखेर ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही, राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका, नगर पालिका, पंचायत समित्या, नगर पंचायती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारनं पाठवलेल्या अध्यादेशात त्रुटी दाखवली होती. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. मात्र, सुधारित अध्यादेश पाठवल्यानंतर अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण बंद झालं होतं. यावरून बराच राजकीय गदारोळ झाला होता. राज्य सरकारनं ओबीसींनी आरक्षण देण्यापूर्वी त्रिसुत्रीचं पालन करावं आणि ओबीसींचा इम्पिरिकल डाटा कोर्टात सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देण्याची योजना आखली होती.
आगामी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हा अध्यादेश मांडला जाईल आणि त्याचं कायद्यात रुपांतर होईल. मात्र हा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, अशी शंका ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक डॉ. हरी नरके यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्रिसुत्रीचं पालन करण्याचे आदेश दिले होते. त्यातील इम्पिरिकल सर्व्हे करून इम्पिरिकल डेटा सादर करण्याच्या सूचना होत्या. या सूचनांची अंमलबजावणी न करताच जर हा अध्यादेश काढला असेल, तर सर्वोच्च न्यायालयात कसा टिकणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मात्र सध्या तरी राज्य सरकारनं या अध्यादेशाद्वारे ओबीसींना राजकीय आरक्षण लागू केलं आहे