मोठी बातमी : काँग्रेसचे दोन आमदार पक्षाला ठोकणार रामराम?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l काँग्रेसचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. आमदार हिरामण खोसकार आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार पराभूत झाला. तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली.
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करत पक्षातून बाहेर काढणार असल्याची चर्चा होती. मात्र आता
क्रॉस व्होटिंग करून गद्दारी करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिले असल्याची माहिती समोर आली आहे.