दोन लाखांची लाच घेताना मोठ्या महिला अधिकाऱ्याला बेड्या
धुळे,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l शासनाने थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम दिली असतानाही ती देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना माध्यमिक शिक्षण विभागात वेतन अधीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या मिनाक्षी भाऊराव गिरी (अधीक्षका,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद धुळे तथा अधीक्षका (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय धुळे) याना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
तक्रारदार व त्यांची पत्नी धुळे येथील महानगर पालिका हायस्कुलमध्ये विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर केला. शिक्षण संचालक पुणे यांनी हे थकीत वेतन अधीक्षक (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु, हे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी मिनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती. तरी वेतन देण्यात आले नाही. १५ ते २० दिवसांपूर्वी तक्रारदार यांनी गिरी यांची भेट घेऊन थकीत वेतन देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार याना लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती.या तक्रारीची मंगळवार रोजी पडताळणी केली असता गिरी यांनी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून २ लाख रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सदरची कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रविण मोरे, मकरंद पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, व जगदीश बडगुजर यांनी केली.