प्रवेश प्रक्रियेसाठी घेऊन जाणाऱ्या आजोबा – नातवाचा भीषण अपघात, आजोबांचा जागीच मृत्यू, नातू गंभीर जखमी
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील आडगाव येथून १६ वर्षीय नातू कल्पेश सोबत ७० वर्षीय वृद्ध आजोबा सुभाष पाटील हे चिंचोली येथे दहावीनंतर पुढील प्रवेशाबाबत माहिती घेण्यासाठी दुचाकीवर जात असताना दुचाकीला चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्याजवळ पिकअप वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातामध्ये आजोबा सुभाष पाटील जागीच ठार झाले तर नातू कल्पेश हा गंभीर जखमी झाला.
यावल तालुक्यातील आडगाव येथील कल्पेश उत्तम पाटील हा नुकताच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे मंगळवारी दि. २० मे रोजी दुचाकी (क्र. एम.एच.०४ बी. एक्स.४५६८) ने सुभाष पाटील हे नातू कल्पेश उत्तम पाटील याला घेऊन चिंचोली येथील विद्यालयात पुढील प्रवेशाची माहिती घेण्यासाठी जात होते. चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यापासून काही अंतरावर त्यांच्या दुचाकीला पीकअप वाहन (क्रमांक एम. एच.०४ के.एफ. ८४४०) वरील अज्ञात चालकाने धडक दिली. या अपघातामध्ये सुभाष बाबुराव पाटील (वय ७०, रा.आडगाव, ता.यावल) हे जागीच ठार झाले तर कल्पेश पाटील याला गंभीर दुखापत झाली.
घटनास्थळी पोलिस पथकासह दाखल झाले. तत्पुर्वी जखमी अवस्थेतील कल्पेश पाटील याला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले तर मयत सुभाष पाटील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
यावल पोलीस ठाण्यात वासुदेव बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून पिकअप वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातवाची प्रकृती गंभीर आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद शेख, हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.