मंत्रिपद गेलं खड्ड्यात,… तर सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा इशारा
जळगाव, मंडे टू मंडे न्युज : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचं अजब विधान लाड यांनी केलं आहे. विरोधकांनी लाड यांना फैलावर घेतलेलं असतानाच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला आहे. मंत्रिपद गेलं खड्ड्यात. शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही, असा इशाराच देत गुलाबराव पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला आहे.
इतिहासाचीच मोडतोड होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विरोधकच नाही तर सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून देखील भाजप आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवरायांच्याबाबतील कोणीही बोलण्याची गरज नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. ज्यांना शिवराय माहीत आहेत त्यांनीच बोलावं. शिवरायांबद्दल बोलताना आता आचारसंहिता करण्याची गरज आहे. कारण सध्या कोणीही येतो आणि शिवरायांबद्दल बोलतो.
छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.