महाराष्ट्रसामाजिक

“गुरुपौर्णिमा” कथा, पार्श्वभूमी ,माहिती

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। 
मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्। 
गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥
सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलम्। 
गुरोरडिध्रपयोबिन्दुसहस्त्रांशेन दुर्लभम्।।
हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन। 
तस्मात् सर्व प्रयन्तेन श्रीगुरूं शरणं व्रजेत्॥
गुरूरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकम्। 
गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरूम्॥

आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. गुरु दोन प्रकारचे असतात एक गुरु ! एक सदगुरु !

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो –
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी
महर्षि व्यास
आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते. व्यास पौर्णिमा असेही तिला म्हणतात; कारण महर्षि व्यास मुनी हे सर्वांचे गुरु मानले गेले आहेत. व्यासांचा जन्म या तिथीस झाला अशी एक कल्पना आहे. पण ती उचित नाही; कारण व्यासांचा जन्म कधी झाला हे त्यांनी कुठेच नोंदलेले नाही.
व्यासांचा जन्म एका द्वीपावर झाला व ते वर्णाने काळे होते. म्हणुन त्यांना कृष्ण द्वैपायन असे नांव मिळाले. परंतु पुढे त्यांनी वेदांची व्यवस्था लावली म्हणून त्यांना ‘व्यास’ ही पदवी मिळाली. पराशर ऋषीपासून मत्स्यगंधा सत्यवतीस जो पुत्र, अविवाहित अवस्थेत झाला तोच व्यास. शूद्र कोळिणीपासून जन्म झाल्यामुळे हा पुत्र जन्मतः शूद्र असला तरी स्वकर्तृत्वाने तो ब्राह्मण ठरला. ब्राह्मणामध्येहि वरिष्ठ ठरला. बालपणीच तपस्या आरंभून तो मुनिश्रेष्ठ, सिद्ध पुरुष झाला. सिद्धी मिळाल्यावर मातेस सोडून दूर जातांना त्याने सांगितले की तूं स्मरण केलेस की मी लगेच भेटेन.
व्यास हे महाभारत हा काव्यात्मक इतिहास लिहिण्यामुळे ख्याति पावले. अठरा पुराणेहि नंतर त्यांनीच रचली अशी कल्पना आहे. महाभारत हा अतिविस्तृत एक लक्ष श्लोकांचा ग्रंथ लिहिणे योजले, तेव्हा इतके लिहिणार कोण हा प्रश्न पडला. गणपतीने लेखन करण्याचे काम पत्करले, पण त्याने अट घातली की तू सांगितलेले मी लिहीले पण तू पुढे लगेच सांगितले नाहीस तर मी काम बंद करीन. व्यासांनीहि अट घातली की तू समजल्याविना लिहिता कामा नये. अटीतटीने हा सामना चालू झाला. व्यास शीघ्र कवि असले तरी केव्हा तरी अडचण येई; तेव्हा व्यास गूढ श्लोक सांगत. त्यावर विचार करत गणपती बसला की हे पुढील रचना करीत. महाभारतात असे 8800 गूढ श्लोक आहेत.
महाभारतात असंख्य विषय मांडलेले आहेत. ते सगळे ज्ञानी व्यासांनी पचविलेले होते. नियोग पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्र, पंडु, व विदूर यांना जन्म दिला. ते स्वतः शास्त्रज्ञ, सायण्टिस्ट होते. त्यामुळे त्यांनी गांधारीचा पाडलेला गर्भ घेऊन, त्यावर संशोधन करून शंभर कौरव निर्माण केले. क्रोमोसोम्सचे पूरे ज्ञान त्यांना होते, त्यामुळे त्यांनी ‘गुणविधी’ हे सायण्टिफिक नांव त्यांनी त्या तत्त्वांना योजले. गुण व विधी म्हणजे कामे ठरविणारी ही तत्त्वे २३ असतात हेहि त्यांनी नोंदलेले आहे. आज सायन्स क्रोमोसोम्स २३ आहेत असेच म्हणते. यावर अनुवंशिक रोग अवलंबून असतात हे व्यासांचे म्हणणेहि सायन्सने आता मानले आहे. व्यासांना खगोलशास्त्रहि अवगत होते. त्यांनी श्वेत, श्याम व तीव्र या नावाखाली युरेनस, नेपच्युन, प्लुटो या ग्रहांची स्थाने महाभारत युद्धसमयी कुठे होती ते नोंदलेले आहे. सर्व ग्रहांची स्थाने त्यांनी दोन पद्धतीने म्हणजे सायन-निरयन मानाने नोंदलेली आहेत. त्यावरून महाभारतीय युद्ध रविवार दि.१६ ऑक्टोबर ५५६१ इसवीसनपूर्व या दिवशी झाले हे मी निश्चित ठरवू शकलो.(इतिहास कार)
अभिजित् नक्षत्र गगनातून ढळले होते ही वैज्ञानिक सत्यकथा त्यांनी महाभारतात लिहून ठेवली आहे. असंख्य नक्षत्रे गगनात असूनहि केवळ एकाबद्द्ल ते सांगतात आणि आजचे विज्ञान नेमके तेच नक्षत्र इ.सनपूर्व १२००० वर्षे या काळी ढळले होते हे मानते, यावरुन व्यासांच्या दिव्य ज्ञानाची पारख होते. ‘जी हलत नाहीत ती नक्षत्रे ही व्याख्या असली तरी नक्षत्रेही हलतात’, असे व्यास म्हणतात, तेहि आजचे विज्ञान मानते आहे.
महाभारतयुद्धारंभी अमावस्या होती हे सांगून ते म्हणतात की सूर्य उगवताच दोन भागांचा झाला व किरण फेकण्याऐवजी ज्वाला फेकू लागला. आजचे विद्वान यावरुन व्यासांना मूर्ख ठरवू बघतात कारण सूर्याचे दोन भाग कसे होतील असे त्यांना वाटते. पण ग्रहणसमयी सूर्य खरोखरीच दोन भाग दर्शवितो, मध्ये काळी तबकडी व भोवती प्रभामंडळ. खग्रास सूर्यग्रहणसमयी खरेच प्रचंड ज्वाला सूर्यपृष्ठावरुन उफाळलेल्या दिसतात असे आजचे सायन्स सांगते.
‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्|’ व्यासांनी सारे जग उष्टे करुन टाकले आहे’, असे म्हणतात ते यावरुन सत्य ठरते. कारण व्यासांना ज्ञात नाही असे काहीच नाही. आजच्या काळातील सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ आइनस्टाइन याने सिद्धांत मांडला की जो कुणी अतिवेगाने अन्तराळात जाऊन परतला तर त्याचे आयुष्य वाढले असल्याचे आढळेल. नेमका हाच सिद्धांत व्यासांनी एका कथेतून सांगितला आहे की ककुद्मी आपली कन्या रेवती हिला घेऊन ब्रह्मलोकी वरसंशोधनासाठी गेला आणि २७ चतुर्युगांनी म्हणजे किमान २१६ वर्षांनी परतला, तरी तो जीवंत राहीला आणि रेवती तरुणच राहीली होती. तिचे लग्न बलरामशी लावले. प्रत्येक ग्रहावर काल भिन्न असतो हे तत्त्वहि व्यासांनी या कथेत सांगितले आहे.
परा व अपरा या दोनहि विद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळविलेले होते. सिद्धीहि मिळवलेल्या होत्या. दिव्य दृष्टीची सिद्धी त्यांनी स्वतःचा शिष्य संजय यास दिली होती; येवढे सामर्थ्य होते. त्यामुळे ते जगत्गुरु ठरले; त्यांचा मान राखण्यासाठी गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा मानतात.

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेची तिथी साजरी केली जाते. याला व्यासपौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असे म्हटले जाते. यंदा गुरुपौर्णिमा ही २१ जुलैला साजरी केली जाणार आहे.

आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची कथा

गुरुपौर्णिमा कथा
महर्षी वेद व्यास यांचा जन्म सुमारे ३००० वर्षांपूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमासारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरु झाल्याचे मानले जाते.

गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन. महर्षी वेदव्यास भगवान विष्णूचे अंश म्हणून पृथ्वीवर आले असे म्हटले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर आणि आईचे नाव सत्यवती होते. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आई-वडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. पण त्यांच्या आई-वडिलांनी ही इच्छा नाकारली.

महर्षि वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरुन त्यांनी तपश्चर्या करण्यासाठी वनात ते गेले. त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्राविण्य प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला. त्यांनी महाभारत, अठरा महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले, त्यांना असे वरदान मिळाले होते. त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून पूजले जाते. आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची नाही तर कुटुंबातील मोठ्या लोकांची तसेच आई-वडिलांना गुरु समान मानले पाहिजे.
गुरुंच्या कृपेने विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यास मुनींचा फोटो ठेवून दिवा आणि उदबत्ती लावा. तसेच फुले, फळे, मिठाई आणि इतर शुभ वस्तू अर्पण करा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!