लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटले; महिला खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा
Monday To Monday NewsNetwork।
हैदराबाद(वृत्तसंस्था)। निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याचे आरोप नेहमीच विरोधक एकमेकांवर करत असतात. मात्र निवडणुकीत मते देण्यासाठी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मतदारांना पैसे दिल्या प्रकरणी तेलंगना राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता यांना नामपल्लीतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. कविता या तेलंगनातील महबूबाबादच्या खासदार आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्यालासुद्धा या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून शिक्षा सुनावली आहे. मलोत कविता यांना 2019 च्या याचिका दाखल करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी कविता लवकरच तेलंगणा उच्च न्यायलयात आव्हान याचिका दाखल करणार आहेत.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी कविता यांचे सहकारी शौकत अली हे पैसे वाटत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले होते. कविता यांना मत देण्यासाठी शौकत अली बर्गमपहाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदारांना 500 रुपये देत होते. शौकत अली यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं आणि लाच प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये कविता यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.पोलिसांनी सुनावणी वेळी फ्लाइंग स्क्वॉ़डच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून हजर केलं. तर त्यांनी तयार केलेला अहवाल पुरावा म्हणून दिला. चौकशी केल्यानंतर शौकत अली यानेही गुन्हा कबूल केला आहे. तसंच कविता यांच्या सांगण्यावरून पैसे वाटल्याचा दावाही केला.
तेलंगणात याआधीही विशेष सत्र न्यायालयाने नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भाजपचे आमदार राजा सिंह आणि टीआरएस आमदार दानम नागेंद्र यांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. राजा सिंह यांच्यावर पोलिसा ठाण्यात एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा होता तर दानम नागेंद्र यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.