रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, रावेर-सावदा रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खंडित
बलवाड़ी. ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | रावेर तालुक्यात शनिवार दुपारी साडेतीन चार वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रावेर शहरासह परिसरातील काही गावांमध्ये कापुर ,हरबऱ्याच्या आकाराच्या गारांचा काही मिनिटे वर्षाव झाला. यामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. वादळामुळे केळी बागांची पाने फाटली असून काही अंशी नुकसान झाले आहे. नुकसानीची माहिती घेण्याचे काम यंत्रणेकडून सुरु असल्याचे तहसीलदार बी ए कापसे यांनी सांगितले.
रावेर सावदा मेन रस्त्यावर पारशा नाल्याजवळ झाड पडल्याने वाहतूक खंडित झाली तसेच दोन तासापासून वीज पुरवठा ही बंद झाला आहे. गेल्या तीनचार दिवसापासून तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशापर्यंत पोहचला होता. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. व गारांचा तुफान वर्षाव झाला. वादळामुळे झाडांची पाने गळाल्याने स्टेशन रोडवर पालापाचोळा जमा झाला होता. चार वाजेपासून सुरु झालेला पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता.
अजंदा, निंबोल, विटवा उटखेडा, भोर, भाटखेडा, पुनखेडा, पातोंडी, विवरा परिसरात गारपीट झाल्याची माहिती मिळाली आहे. निंभोरा सह इतर गावात वारा, पाऊस बरसला. रावेर सावदा रस्त्यावर वादळामुळे निंबाचे झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक खंडित झाली.
आज शनिवार हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात बहुतेक गावांमध्ये कार्यक्रम असल्याने यात पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. वादळामुळे केळी बागांची पाने फाटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यामुळे काही अंशी केळी बागांचे नुकसान झाले आहे.