आ.अमोल जावळे यांच्या दौऱ्यानंतर आरोग्य प्रशासनात खळबळ : पाल ग्रामीण रुग्णालयाच्या सुधारणा प्रक्रियेला वेग
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील पाल येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांच्या अचानक भेटीनंतर प्रशासनाने तात्काळ सुधारणा प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत आक्षेप घेतल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी करून सुधारणा प्रक्रियेचे आदेश दिले.
रुग्णालयातील स्वच्छतेच्या अभावासाठी जबाबदार ठरलेल्या स्वच्छता कर्मचारी तेजस चंदेले यांना शोकोज नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
डॉ. कळसकर यांच्याकडे सध्या रावेर आणि पाल रुग्णालयाचा चार्ज होता. मात्र, प्रशासनाने रावेर रुग्णालयाचा चार्ज काढून त्यांना केवळ पाल रुग्णालयाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे पाल रुग्णालयाकडे अधिक लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आमदार जावळे यांच्या सूचनेनुसार, रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा, रुग्णवाहिका सेवा आणि स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही या बाबतीत तातडीने उपाययोजनांचे आदेश दिले आहेत.
पाल रुग्णालय हे सुमारे 23-25 आदिवासी गावांना सेवा पुरवते. त्यामुळे आदिवासी रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे. “आदिवासी रुग्णांच्या हक्कांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, अन्यथा कठोर निर्णय घेण्यात येतील,” असे आमदार अमोल जावळे यांनी पुन्हा एकदा बजावले आहे.
आमदारांच्या हस्तक्षेपामुळे रुग्णालयातील सुधारणा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. “ही सुधारणा टिकून राहावी आणि रुग्णालयाच्या व्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता असावी,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. आमदार जावळे यांच्या या ठोस भूमिकेमुळे आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा