आज “या” भागात अती मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l संपूर्ण राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. येत्या ४८ तासांतील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज हवामान खात्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पावसाचा जोर वाढणार असून येत्या १३ जूनपर्यंत अतिवृष्टी होईल, असं आयएमडीने म्हटलं आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत मान्सूनने निम्मा महाराष्ट्र गाठला असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना सह आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.यासोबतच उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) तसंच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिकमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (५०-६०किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.