उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पाऊस, राज्यात ‘ या ‘ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | श्री गणेशाच्या आगमनापूर्वीच राज्यात पावसाची जोरदार पाऊस कोसळणार आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भासह २६ ऑगस्ट मंगळवार रोजी राज्यातील तब्बल १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सातही जिल्ह्यांना २६ ऑगस्ट साठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
पुण्याच्या घाट परिसराला मुसळधार तर पुणे शहरांमध्येही मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.


