अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगर वासीयांच्या जीविताला धोका; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी |मुक्ताईनगर शहरात हायवे चौफुली वरून तसेच पुरणाड फाट्यावरून मोठमोठे ट्रक, कंटेनर शहरात प्रवेश करीत असल्याने अवजड वाहतुकीमुळे मुक्ताईनगर वासीयांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाकडून कारवाईची मागणी नागरिकामधून होत आहे.
मुक्ताईनगर शहरात हायवे चौफुली वरून तसेच पुरणाड फाट्यावरून मोठमोठे ट्रक, कंटेनर शहरात प्रवेश करीत असतात व त्यामुळे चौफुली वरील खरेदी करणारे मुक्ताईनगर येथील नागरिक यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे कारण हे कंटेनर वाले भरदाव वेगाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक चालवीत असतात प्रसंगी ते दारूच्या नशेत सुद्धा असतात परंतु या कारणामुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा यात बळी जाण्याच्यी शक्यता बळावली आहे. बिनदिक्कतपणे शहरातून ही अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसत आहे. शहरातून वाहतूक बिनदिक्कत होत असताना पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का बसतात असाच काहीसा प्रश्न नगरकरांना पडला आहे.
तत्कालीन पोलीस निरीक्षक राऊळ खताळ यांनी यावरती उपाय म्हणून हायवे चौफुली वरती दोन होमगार्ड यांची कायमस्वरूपी नियुक्ती करून अवजड वाहतुकीवर नियंत्रण मिळवले होते परंतु आता होमगार्डची तिथे नियुक्ती नसल्यामुळे कंटेनर सर्रासपणे भरधाव वेगात शहरातून ये जा करीत असल्यामुळे मोटरसायकल स्वारांना व पायी चालनाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झालेला आहे. यावर उपाय म्हणून हायवे चौफुली वरती तसेच पुरणाड फाट्यावरती होमगार्ड किंवा पोलिसांची नियुक्ती करण्याची गरज असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे. पोलीस प्रशासन आता याकडे किती गांभीर्याने विचार करते याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.
कुणाच्या आशीर्वादाने जड वाहतूक?
अवजड वाहनांना पोलिसांच्या आशीर्वादानेच शहरात प्रवेश मिळत असल्याचे जगजाहीर आहे. बायपास चौकात पोलीस तैनात असताना वाहनचालक मोठे धाडस करून शहरात प्रवेश करतात. त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी ही बाब गांभीर्याने घेऊन त्यावर वेळीच कारवाईचे धाडस दाखवले तर शहरात अवजड वाहनाखाली जाणारे नागरिकांचे जीव वाचणार आहेत.