हॅलो… पीएमओ कार्यालयातून बोलतोय…विधानसभेची उमेदवारी पाहिजे असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील – आमदारांना दिल्लीतून फोन
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभेची उमेदवारी पाहिजे असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील. अशी मागणी करत भाजप आमदाराला दिल्लीतून फोन आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची पोलिसांनी चौकशी करून शोध घेतला असता या घटनेतील रुपयांची मागणी करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घमासान सुरू असताना सर्वच पक्षाकडून उमेदवारीसाठी तिकीट वाटप सुरू आहे. इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षांकडून उमेदवारी मिळवण्या साठी प्रयत्न करीत आहेत. यादीत आपले नाव येते की नाही, आपल्याला यंदा तिकीट मिळते की नाही, अशा प्रश्नांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आहेत. भाजप, कांग्रेस, मनसे,राष्ट्रवादी, वंचित अशा बऱ्याच पक्षांनी आपल्या काही उमेदवारांची घोषणा केली असताना त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील भाजपच्या विद्यमान आमदाराला तिकीट देण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तिकिटा साठी इच्छुकांची धडफड सुरू असल्याचा फायदा घेत दोन महाविद्यालय तरुणांनी सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे विद्यमान आमदारांना फोन करुन ५० लाखांची मागणी केली. “आम्ही पीएमओ कार्यालयातून बोलतो आहे, तुम्हाला जर उमेदवारी पाहिजे असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील,” असे दूरध्वनी वरून सांगण्यात आले. मात्र, विद्यमान आमदारांना शंका आल्याने त्यांनी या संदर्भात नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली होती. या घटनेची गांभीर्यता पाहून पोलीस आयुक्तांनी तपास गुन्हे शाखे युनिट १ कडे वर्ग केला होता. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनेचा तपास केला असता, पोलिसांनी दोन तरुणांना दिल्लीहून ताब्यात घेतलं आहे. तसेच, या दोघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नाशिक शहरात भाजपचे विद्यमान आमदार तसेच अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना फोन केल्याची कबुली दिली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.