भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

मध्यरात्री १२ दरोडेखोरांचा हैदोस, दिसेल त्याला मारहाण : घरमालक गंभीर; 6 लाखांचा ऐवज लंपास, एकाला पाठलाग करून बांधले

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्याचा गुन्हेगारीकडे वेगाने सुरू असलेला प्रवास थांबायला तयार नाही. या आठवड्यात झालेल्या दोन निर्घृण खुनानंतर आता सिन्नर तालुक्यातल्या मलढोण शिवारात घडलेल्या दरोड्याच्या घटनेने पुन्हा एकदा नागरिकांचा थरकाप उडाला आहे. जवळपास दहा ते बारा दरोडेखोरांच्या टोळीने मध्यरात्री अक्षरशः दिसेल त्याला मारहाण करत हैदोस घातला. महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडले. या घटनेत घरमालक गंभीर जखमी झाले असून, दरोडेखोर 6 लाखांचा ऐवज घेऊन पसार झालेत.

सिन्नर तालुक्याच्या पूर्वेला समृद्धी महामार्गाजवळ सरोदी वस्ती आहे. येथेच वाल्मिक सरोदे आपल्या चार मुलांसह राहतात. रात्री त्यांची पत्नी विमल, आई रखमाबाई, नातू संकेत हे ओसरीवर झोपले होते. मध्यरात्री अंदाजे दोनच्या सुमारास वेगवेगळ्या मोटारसायकलवर दहा ते बारा दरोडेखोर येथे आले. त्यांनी ओसरीवर झोपलेल्या चौघांनाही बेदम मारहाण सुरू केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ माजला. आरडाओरड सुरू झाली. हा आवाज ऐकुण वाल्मिक सरोदे यांचा शेजारच्या खोलीत झोपलेला मुलगा योगेश आणि त्याची पत्नी जागी झाली. तेव्हा वडील वाल्मिक यांना दरोडेखोर गजाने मारहाण करत असल्याचे त्याला दिसले. एकाने बीअरची बाटलीही त्यांच्या डोक्यात फोडली.

एकीकडे अशी मारहाण सुरू असताना दुसरे पाच-सहा जण अचानक दगड आणि विटांचा मारा करत घरात घुसले. त्यांनी घरातील महिलांचा गळा दाबून मंगळसूत्र हिसकावले. महिलांच्या अंगावरील नेकलेस, कानातील, पायातील जोडवे, सोन्याची पोत, चैन अशा दिसेल त्या वस्तू अक्षरशः ओरबाडून आणि हिसकावून घेतल्या. घरातील कपाटाची झडती घेतली. त्यातले सोन्याची अंगठी, चैन आणि इतर साहित्य घेतले. लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही. हे चित्र भीषण होते. दरोडेखोरांचा अक्षरशः हैदोस सुरू होता. दिसेल त्याला मारायचे. अंगावरील दागिने हिसकावायचे. यामुळे आरडाओरडा, गोंधळ वाढलेला. हा गोंधळ ऐकुण दुसऱ्या नव्या घरात झोपलेले वाल्मिक यांचा मुलगा जागा झाला. त्यांनी आपल्या घराकडे धाव घेतली. शेजारचे लोकही जागे झाले. त्यामुळे दरोडेखोरांनी दिसेल ते हिसकावत लोक जमा होताच पळ काढला. मात्र, जमावाने त्यांचा पाठलाग सुरू केला.

वाल्मिक यांच्या दोन्ही मुलांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. दरोडेखोर दुचाकीवर बसून फरार होत होते. एका दुचाकीला त्यांनी पकडले. तेव्हा दुचाकीवरील दोघे जण पळून गेले. मात्र, एकजण तावडीत सापडला. यावेळी दरोडेखोर आणि सरोदेच्या मुलांमध्ये झटापट झाली. त्यात दरोडेखोर जखमी झाला. सरोदेच्या मुलांनी त्याला बांधून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह इतर टीमने घटनास्थळी भेट दिली. दरोडेखोराला ताब्यात घेतले आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इतर गुन्हेगारांची नावे सांगितली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पकडलेल्या संशयिताचे नाव ऋषिकेश विजय राठोड असून, तो अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रुई गावचा आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!