महाराष्ट्रात औरंगजेबचे फलक, बॅनर वर बंदी आणा! हिंदु राष्ट्र समन्वय समितीची निवेदनाद्वारे मागणी, गुन्हा दाखल
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वाघोदा, ता. रावेर, जिल्हा जळगाव येथे १६ जानेवारी या दिवशी मुस्लिम समुदायाने संदल (मिरवणूक) काढली होती. त्यात हिंदू समाजाला डिवचण्यासाठी मुद्दामहून औरंगजेब आणि १५ मिनिट शब्द लिहिलेला ओवैसी बंधू यांचे फलक झळकावण्यात आले होते. यासंदर्भात फलक पकडणारे आणि संदलचे आयोजक यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, तसेच महाराष्ट्रात औरंगजेबचे बॅनर/फलक लावण्यावर बंदी घालण्यात यावी या मागण्यांचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समिती (यावल – रावेर विभाग) च्या वतीने देण्यात आले. फैजपूर येथील प्रांत श्री. काकडे यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार जगदीश गुरव यांना निवेदन स्वीकारले. समितीच्या वतीने सर्वश्री निलेश चौधरी, अमोल निंबाळे, धीरज भोळे, यशवंत चौधरी स्वप्नील पवार, ऋषिकेश मराठे, निखिल माळी, अतुल महाजन, निलेश कोल्हे, कुणाल कोल्हे तसेच सावदा, वाघोदा येथील धर्मप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनाच्या माध्यमातून समितीने पुढील मागण्या केल्या : १. महाराष्ट्रात औरंगजेबचे उदात्तीकरण सार्वजनिक पणे करणे, त्याचे फलक झळकवणे आदी कृत्यांवर राज्यात / जिल्ह्यात बंदी घालण्यात यावी; २. ‘हिंदूं कार्यकर्त्यांनी अफझलखान वधाचा फलक लावल्यावर स्वतःहून कारवाई करणारे पोलीस अशा वेळी मात्र तक्रार करणाऱ्याची वाट पाहून वेळ घालवतात आणि आरोपींना पुरावा नष्ट करण्याची संधी देतात. सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीच संदर्भात दिलेल्या आदेशात चिथावणीखोर, आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याबद्दल, लिखाण अथवा हावभाव केल्याबद्दल पोलिसांनी स्वतः हून गुन्हा नोंद करावा असे म्हंटलेले आहे. तरीही येथे पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी; ३.संदल मध्ये आक्षेपार्ह, चिथावणीखोर आणि धार्मिक भावना दुखावणारे फलक पकडल्याबद्दल ते धरणारे संबंधित आणि ते पकडू देणारे संदलचे आयोजक यांच्यावर गुन्हा नोंदवावा
सावदा पोलीस स्टेशन येथे संदल मध्ये आक्षेपार्ह फलक पकडल्याप्रकरणी गुन्हा नोंद !
सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक विशाल पाटील यांची भेट घेऊन तक्रार दिल्यानंतर आणि सर्व भूमिका समजावून सांगितल्यावर त्यांनीही तत्परतेने गुन्हा नोंदवून घेतला. धार्मिक भावना दुखावल्याविषयी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.