मी सीबीआय अधिकारी बोलतोय, तुम्हाला तीन वर्षांची शिक्षा होणार ….महिलेला साडे आठ लाखांचा चुना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी एका महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकल्याचे सांगत व यात तुम्हाला ३ वर्षाची शिक्षा होणार असल्याची सांगत महिलेला ८ लाख ५० हजार रुपयांचा चूना लावल्याची घटना चाळीसगाव येथे उघडकीस आली .
४२ वर्षीय महिला चाळीसगाव शहरातील विवेकानंद कॉलनी भागात खासगी ठिकाणी नोकरी करते. त्यांना दि. ११ जून रोजी व्हॉटसॲप वरुन फोन आला. त्यातील एका व्यक्तीने त्याचे नाव अनिल यादव सांगून,मी सीबीआयचा अधिकारी बोलतोय, आपण एका गुन्ह्यात अडकल्या आहात. असे सांगितले.पण सुरुवातीला महिलेने या कॉलकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर पुन्हा सुनील कुमार नामक व्यक्तीचा फोन आला, तसेच संबधित व्यक्तीने देखील आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र महिला घाबरली.
काही वेळानंतर हे फोन येतच राहिले. तसेच ज्या गुन्ह्यात ती महिला अडकली असल्याचे तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात महिलेला ३ वर्षाची शिक्षा होणार असल्याचीही धमकी संबधितांनी महिलेला दिली. तसेच या शिक्षेपासून वाचायचे असल्यास ऑनलाईन पध्दतीने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देण्याची मागणी केली.
यानंतर घाबरलेल्या महिलेने ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम नकली सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली. ही रक्कम वर्ग केल्यानंतर संबधित महिलेने त्या दोघांना फोन केला. मात्र, दोघांचे फोन नंबर बंद आले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संबधित महिलेने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सीबीआयचे आधिकारी सांगणाऱ्या दोन्ही अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.