भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

अपघातात जखमींना मदत केल्यास मिळणार २५ हजारांचे बक्षीस

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दरवर्षी रस्त्यावरील अपघातात अनेक जणांना आपला जीव गमावावा लागतो. वेळ नाही, पोलिस आपल्यालाच अडकवतील,कोण पडेल या झंझट मध्ये असे म्हणत बरेच जण अपघातग्रस्तांची मदत करत नाहीत. अपघात ग्रस्तांना वेळेत उपचार मिळाला तर कित्येक लोकांचा जीव वाचू शकतो. अपघातातील जखमी लोकांची मदत न करण्याची लोकांची ही सवय बदलण्यासाठी आणि त्यांना माणुसकी दाखवत अपघातग्रस्तांची मदत करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत एक महत्त्वाचा व मोठा निर्णय घेतला आहे.

यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे की, कोणीही अपघातग्रस्तांची मदत केली तर केंद्र सरकार त्यांना आता २५ हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. देशात सुरक्षित प्रवासाला चालना मिळावी आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळून त्यांचे प्राण वाचवता यावेत .यासाठी हा निर्णय घेतला आहे.

अनेक प्रकरणात पोलिसांना साक्षीदार मिळत नाहीत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीने पोलिसांना या अपघाताची माहिती दिलेली असते त्या व्यक्तीलाच साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. रस्ते अपघातामधील पीडितांना मदत करणारे पोलिसांच्या कायदेशीर कार्यवाहीचा भाग बनतात. त्यात त्यांचा खूप वेळ जातो, तसेच त्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकजण पोलिसांना अपघातांची माहिती देणं टाळतात. काही घटनांमध्ये अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या व्यक्तीला या अपघात प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा त्रासामुळे रस्त्यावरील व्यक्ती अपघातग्रस्तांना मदत करण्यास उत्सुक नसते.

सिने अभिनेते अनुपम खेर यांच्याबरोबर नागपूर मध्ये रस्तासुरक्षेबाबत आयोजित एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आता देखील अशा प्रकारचं बक्षीस दिलं जात आहे. परंतु, त्या बक्षिसाची रक्कम खूप कमी आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र मी बक्षिसाची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यावर कोणीही एखादा अपघात पाहिला तर एका तासाच्या आत अपघातग्रस्ताला रुग्णालयात नेणाऱ्या व्यक्तीला २५ हजारांच हे बक्षीस दिलं जाईल. सध्या ही रक्कम पाच हजार रुपये इतकी आहे. म्हणजेच बक्षिसाची रक्कम पाच पटींनी वाढवली जाणार आहे” असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.  गडकरी पुढे म्हणाले की, सरकार आता अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी पहिल्या सात दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचा हॉस्पिटल खर्च कव्हर करेल. ही योजना राष्ट्रीय महामार्गांवर जखमी झालेल्या लोकांपुरती मर्यादित नसून राज्य महामार्गांवर जखमी झालेल्या लोकांनाही लागू होते, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!