गॅस सिलिंडर सह इतर साहित्य जप्त, अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त
चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी भरलेले व रिकामे अशा ९ गॅस सिलिंडरासह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याठिकाणी सर्रासपणे वाहनांमध्ये गॅस भरला जात होता.
मिळालेल्या माहितीनुसार,चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे सर्रासपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ९ हजार रुपये किमतीचे सीलबंद स्थितीत असलेले घरगुती वापराचे तीन सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे सहा रिकामे सिलिंडर असे ९ गॅस सिलिंडर व १० हजार रुपये किमतीचे गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशीन व इलेक्ट्रिक मोटार तसेच प्लॅस्टिकच्या नळ्या, रेग्युलेटर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे कीट असा एकूण ३१ हजारांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी दीपक केवट रा. वाघळी याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, चालक भरत पाटील, हवालदार प्रवीण सपकाळे यांनी ही कारवाई केली.