अत्यंत क्रूरपणे गोवंशाना कोंबून गोवंशाची अवैध वाहतूक, एका आरोपीला अटक, दोन फरार
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शहरात गोवंशाची अवैध आणि अत्यंत निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या टोळीवर सावदा गो रक्षकांच्या प्रसंगावधानाने पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले असून त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी ७ गोवंश आणि एक बोलेरो पिकअप वाहन असा एकूण सुमारे ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही संपूर्ण कारवाई बजरंग दलाच्या (गो रक्षकांच्या) कार्यकर्त्यांच्या खबरीवरून करण्यात आली.
संशयित आरोपी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. MH 39 C 7305) मधून गोवंशाची अवैध वाहतूक करत असल्याची गो-रक्षकांच्या प्रसंगावधानाने पोलिसांनी संबंधित वाहन अडवले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये अत्यंत क्रूरपणे ७ गोवंश कोंबलेले असल्याचे आढळून आले. या जनावरांचे हात-पाय आणि गळे दोरीने घट्ट बांधण्यात आले होते, त्यामुळे त्यांना हालचाल करणे अशक्य झाले होते. तसेच कोणत्याही प्रकारचा चारा-पाणी किंवा पुरेशी जागा न देता त्यांची कत्तलीच्या उद्देशाने ने-आण केली जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आवेश असलम शेख (वय २५, रा. गौसीयानगर, सावदा) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. मात्र त्याचे साथीदार सलीम पठाण (रा. फैजपूर) आणि शफीक व्यापारी (रा. वरणगाव) हे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
संशयित आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जप्त केलेले गोवंश सध्या सुरक्षित असून त्यांच्या पुढील देखभालीसाठी त्यांना तातडीने गौशाळेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ संजीव चौधरी करत आहेत.


