धक्कादायक : मतृदिनीच मुलाने केली जन्मदत्या आईची हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रविवार दि. १२ मे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच मतृदिनी प्लॉटच्या विक्रीच्या वादातून एका ६० वर्षीय आईस तिचा मुलगा व सुनेने डोके आपटून ठार मारल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील केवडीपुरा
येथील असून रविवार दि. १२ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
विमलबाई रोहिदास मोहिते. वय ६०, रा. केवडीपुरा ता. एरंडोल. असे मयत महिलेचे नाव आहे. गावात त्या पती रोहिदास, मुलगा बापू, सून शिवराबाई यांचेसह राहत होत्या. त्यांच्या घराच्या जवळ त्यांचा एक प्लॉट होता. हा प्लॉट विक्री करावा, म्हणून त्यांचा मुलगा बापू मोहिते आणि सून हिवराबाई सारखे विमलबाई हीस त्रास द्यायचे. मारहाण देखील करायचे. त्यामुळे विमलबाई ह्या कधी मुसळी फाटा येथे तर कधी एरंडोल येथे राहण्यासाठी गेल्या होत्या.
मुलगा आणि सून वारंवार त्रास देत असल्यामुळे विमलबाई मोहिते यांच्या नातेवाईकांनी बैठक बोलावून मुलगा आणि सुनेला याबाबत समजूत घातली होती. मात्र तरीदेखील मुलगा बापू आणि सून शिवराबाई यांच्या वर्तणुकीत फारसा फरक पडलेला नव्हता. रविवारी दि. १२ मे रोजी पहाटे ३ वाजता सुमारास विमलबाई मोहिते यांचा तिखी ता. जि. धुळे येथील भाचा संजय मोहिते याला कासोदा येथील राजू बेलदार याने फोन करून विमलबाई मोहिते मयत झाल्याचे माहिती दिली.
त्यानंतर फिर्यादी वसंत उमराव मोहिते यांच्यासह त्यांचा परिवार तिखी येथून केवडीपुरा येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास आले. त्या ठिकाणी विमलबाई मोहिते यांच्या चेहऱ्याला, कानाला रक्त येत असलेले दिसले. त्यांनी मुलगा बापू मोहिते यास विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. त्यानंतर एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. यानंतर विमलबाई मोहिते यांचा भाचा वसंत उमराव मोहिते (वय ३२ रा. तिखी ता. जिल्हा धुळे) यांच्या फिर्यादीवरून मुलगा बापू रोहिदास मोहिते व सून शिवरा बापू मोहिते यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरहू घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.