विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : राज्यात ११ वी प्रवेश प्रक्रिया आता ऑनलाइन होणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आगामी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ११ वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. ही प्रक्रिया आगामी शैक्षणिक वर्षापासून आता संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेवर शिक्षण आयुक्त नियंत्रण ठेवणार असून, त्याची अंमलबजावणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.
या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक शाखानिहाय तुकड्या, अनुदानित-विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाखानिहाय प्रवेश क्षमता, उपलब्ध विषय आदी अद्ययावत माहिती सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक हे शिक्षण संचालकांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास उपलब्ध करतील.
या पूर्वी अशी ११ वी प्रवेश प्रक्रिया २००९-१० या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे आणि रायगड या मुंबई महानगर प्रदेशातील तर २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. त्या नंतर अमरावती, नागपूर आणि नाशिक पालिका क्षेत्रांपर्यंत त्याचा विस्तार वाढवण्यात आला.
गेल्या काही वर्षांपूर्वी अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी आणि पालकांना
अर्ज मिळवावा लागत होता. व प्रत्यक्ष तेथे जाऊन प्रवेश घ्यावा लागत होता. या प्रक्रियेत विद्यार्थी पालक यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्या साठी राज्य सरकार ही सर्व प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवावी, असा विचार करत होती.
आता आगामी अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने आगामी शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रक्रियेत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा अंतर्भाव करण्यात येणार असून ही प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक शाखानिहाय तुकड्या, अनुदानित- विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाखानिहाय प्रवेश क्षमता, उपलब्ध विषय आदी अद्ययावत माहिती सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक हे शिक्षण संचालकांनी निश्चित केलेल्या ऑनलाइन सेवा पुरवठादारास उपलब्ध करतील.
तसेच राज्य सरकारने अशा सूचना केल्या आहेत की, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर विद्यार्थी आणि पालकांना ही प्रक्रिया समजावी, यासाठी त्याची जनजागृती करावी, तसेच आवश्यकता असल्यास त्याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करुन द्यावे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा