ब्रेकिंग : रावेर तालुक्यात मजुरांच्या अंगावर विज कोसळून ५ जण गंभीर जखमी
रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l आज मंगळवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी रावेर तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने शेत परिसरात मजुरी करून राहणारे पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारा नंतर बुरहानपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यातील दोधे या गावात मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने दोधे गावात राहणारे मीराबाई प्रताप जमरे.वय ३० वर्ष. पूजा प्रताप जमरे.वय १३ वर्ष. रेखाबाई खरते . वय ३० वर्ष. कालू खरते. वय ३० वर्ष. आणि ज्योती चंद्रसिंग रावत. वय ३० वर्ष. असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी असून, उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते. शेतात राहुट्या उभारून ते राहत होते.
जखमींची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गाव हादरले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.