भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाची टाच : ४० मालमत्ता जप्त !

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : केंद्रीय तपास यंत्रणा विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाचा आणखी एक नवा अंक राज्यात पहायला मिळाला आहे. शिवसेना नेतृत्वाच्या जवळचे मानले जाणारे, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने कारवाई करत त्यांच्या आणि परिवाराच्या ४० मालमत्ता जप्त केल्या आहेत. जाधव यांना मोठा झटका बसला आहे.

आयकर विभागाने जप्त केलेल्या ४० मालमत्तांमध्ये Bilakhadi Chambers बिल्डींगमधील ३१ फ्लॅट, भायखळा येथील Imperial Crown हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने यशवंत जाधव यांच्या मालमत्तांवर धाडी टाकत तपासाला सुरुवात केली होती. या तपासात यशवंत जाधव यांच्या परिवाराला बोगस कंपन्यांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज मिळाल्याचं आयकर विभागाला समजलं होतं. या पैशांच्या माध्यमातून जाधव परिवाराने मनी लाँड्रींग केल्याचं आयकर विभागाचं म्हणणं असून यासंदर्भातले काही पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत. यशवंत जाधव यांच्या ४० मालमत्ता आयकर विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भायखळ्यात 26 फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई झाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळ्यातल्या बिलकाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट खेरदी केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिल्याचा बोललं जातं. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. त्याचवेळी आयकर विभागाने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरु करत अखेर जप्तीची कारवाई केली आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर चार दिवस त्यांची चौकशी सुरु होती. जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे. आधी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि 50 लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी 75 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव दाम्पत्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!