आनंदाची बातमी; भारतातील दोन कोरोनावरील स्वदेशी लशींची चाचणी, परिणाम सकारात्मक !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशभरात कोरोनाने कहर सुरू असतांना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशवासीयांसाठी चांगली बातमी दिली आहे. देशात एकूण दोन स्वदेशी लशींची चाचणी घेण्यात येत असून या चाचण्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशातील लशीच्या उपलब्धतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेव्यतिरिक्त विविध देशांकडूनही व्यक्तीगत स्वरुपात भारताशी संपर्क केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.तसेच जेव्हा केव्हा कोरोनावरील लस विकसीत होईल, त्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
याबाबत सविस्तर अस की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी १० लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सकात्मक असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे. यात डॉक्टर्स आणि परिचारिकांचे महत्वाचे योगदान आहे, असे भूषण म्हणाले. एप्रिल महिन्यात करोना रुग्ण बरे होण्याचा दर ७.८५ टक्के इतका होता. आज मात्र हा दर ६४.४ टक्के इतका झाला आहे. देशभरातील एकूण १६ राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा सरासरीपेक्षा अधिक असून यात या राज्यांमध्ये दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के, लडाखचा दर ८० टक्के, हरयाणाचा दर ७८ टक्के, आसामचा दर ७६ टक्के, तामिळनाडूचा आणि गुजरातचा दर ७३ टक्के, राजस्थानचा दर ७० टक्के, मध्य प्रदेशचा दर ६९ टक्के आणि गोव्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ६८ टक्के इतका असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.