दिलासादायक! कोरोनावर लसीआधी येऊ शकतं भारतीय औषध, 3 चाचण्याही झाल्या यशस्वी
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना या जीवघेण्या आजारावर लस कधी येणार याबाबत कोणीच ठाम सांगू शकत नाही. पण अशात भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं औषध हे कोरोनाच्या लसीआधी उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि कॅडिला फार्मास्युटिकल्स यांनी विकसित केलेल्या आणि बाजारात उपलब्ध असलेल्या ‘सेप्सिव्हॅक’ या औषधाच्या तीन वेगवेगळ्या समुहावर चाचण्या होत आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात धोका जाणवत आहे आणि ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशा रुग्णांवरही याचा उत्त्म परिणाम दिसून आल्याचं सांगण्यात येत आहे. यासंबंधी सीएसआयआरचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी ‘एका वृत्तवाहिनी’ला माहिती दिली आहे. सेप्सिव्हॅक हे औषध गंभीर संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे कोरोना सारख्या जीवघेण्या संसर्गावरही या औषधांचा प्रयोग करण्यात आला तर त्यातून यशस्वी चाचण्या समोर आल्या आहेत.
कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असतानाही अशा रुग्णांवर हे औषध प्रभावीपणे काम करतं असं चाचण्यांमधून समोर आलं. त्यामुळे covid-19 संसर्ग रोखण्यासाठी हे औषध उपयुक्त ठरू शकेल अशी आशा डॉक्टर मांडे यांनी व्यक्त केली आहे. या औषधाची गंभीर रुग्णांवर चाचणी करावी यासाठी एप्रिलमध्ये परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार व्हेंटिलेटरवर असणाऱ्या ते साध्या आणि कमी प्रमाणात संसर्ग असणाऱ्या रुग्णांवर औषधाची चाचणी करण्यात आली तर त्यातून रुग्णांना संसर्गाचा धोका कमी झाल्याचं समोर आलं. त्यामुळे हे औषध कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त आहे असं मांडे यांचं म्हणणं आहे.