“इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका,” अजित पवार यांचा कोकाटे यांना तिसऱ्या चुकीसाठी गंभीर परिणामांचा इशारा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त कृतींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात कोकाटे यांची भेट घेऊन “बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय,” असं अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावत त्यांना कडक शब्दांत समज दिल्याची माहिती समोर आली आहे.
कोकाटे यांच्या विधानसभेतील रमी गेम खेळण्याच्या व्हिडीओ प्रकरणाने आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला अडचणीत आणले आहे.
विधानसभेत पावसाळी अधिवेशना दरम्यान माणिकराव कोकाटे यांचा मोबाइलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याशिवाय, कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानेही मोठा वाद निर्माण झाला.
आज २९ जुलै मंगळवार रोजी मंत्रालयात झालेल्या भेटीत अजित पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या कृती आणि वक्तव्यांवरून समज दिली. “कृषिमंत्री असो वा कोणीही, लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवावे. तुमच्या चुकीमुळे सरकारची बदनामी होत आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही कोकाटे यांना दोनदा समज देण्यात आली होती. “इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका,” असे सांगत पवार यांनी कोकाटे यांना तिसऱ्या चुकीसाठी गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.


