इस्रायलचा दावा : कोरोनावर ‘जादूई’ लस विकसित !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता इस्रायलनेही करोनाला मात देणाऱ्या जादूई लस शोधली असल्याचा दावा केला आहे. या लशीची मानवी चाचणीसाठी सरकारकडून परवानगी घेण्यात येणार आहे. या लशीची चाचणी येत्या दोन महिन्यानंतर पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांट्ज यांनी इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चला भेट देऊन लशीबाबत माहिती घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लशीमुळे मानवी शरीरात ताबडतोब अॅण्टी बॉडीज तयार होतील. त्यामुळेे कोरोनाला अटकाव करणे शक्य होणार आहे. या लशीबाबत जाणून घेण्याची उत्सुकता जगात वाढली आहे. दरम्यान, याआधी मे महिन्यात इस्रायलच्या डिफेंस बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटने कोरोनाला अटकाव करणारी लस विकसित केली असल्याचा दावा केला होता. या लशीमुळे अॅण्टीबॉडी लस विकसित होत असल्याचा दावा करण्यात आला होता. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाअंतर्गत अत्यंत गोपनीय पद्धतीने कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या संशोधनाबाबत नफ्ताली यांनी लसीची घोषणा केली होती. इस्राइलचे संरक्षण मंत्री नफ्ताली बेनेट यांच्या दाव्यानुसार ही लस मोनोक्लोनल न्यूट्रॅलिटींगनुसार शरीरातील व्हायरसवर हल्ला करते आणि शरीरातच कोरोनाच्या विषाणूंचा नायनाट करते. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चचे संचालक प्रा. शॅम्युअल शपिरा यांनी संरक्षण मंत्र्यांना इस्रायली लशीची माहिती दिली. इस्रायली संरक्षण आणि पंतप्रधान कार्यालयानेदेखील एक निवेदनाद्वारे या लशीची माहिती दिली आहे. या लशीची मानवी चाचणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चचे संचालक प्रा.शॅम्युअल शपिरा यांनी सांगितले की, शरद ऋतूची सुट्टी संपल्यानंतर या लशीची मानवी चाचणी घेण्यात येणार आहे. या लशीबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही. ही लस विकसित करणाऱ्या टीमवर आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. ही लस कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती मात्र, देण्यात आली नाही.