अमळनेरक्राईमजळगाव

नणंदेनेच केली प्रियकराच्या मदतीने वहिनीची हत्या

जळगाव जिल्ह्यातील तरुण विवाहितेच्या हत्येचा उलगडा

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l काल दी.२२ सप्टेंबर रविवार रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गांधलीपुरा भागात सकाळी १० वाजेच्या दरम्यान विवाहित तरुणीची हत्या करण्यात आली. अमळनेर नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर सासूच्या जागेवर सून लागू नये, तिच्या जागी आपणच लागावे म्हणून सुनेच्या नणंदेनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या तपासात समोर आली.

रविवारी दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान मेहतर कॉलनी समोर बोरी नदीच्या काठावर झुडपांमध्ये शितल जय घोगले .वय ३५ वर्ष.  रा. मेहकर कॉलनी, गांधलीपुरा, अमळनेर. या विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी माहिती व पुराव्याच्या आधारे त्यांनी मयत शितल घोगले हिची नणंद व तिचा प्रियकर यांना अटक केली.

तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. मयत शितल घोगले यांची सासू पारोबाई परशुराम घोगले (वय ५५ वर्ष) या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा जय हा आजारी असतो. म्हणून पारूबाई यांच्या जागी नोकरीवर त्यांची सून शितल लागेल. तिच्या ऐवजी मुलगी म्हणून आपणच लागले पाहिजे असा विचार शितल घोगले यांच्या नणंदेचा तथा पारूबाई यांची मुलगी मंगला हिचा होता. आणि त्यातूनच हे हत्याकांड घडले.

रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शितल आणि मंगलाबाई या दोघी नणंद भावजय शौचासाठी काटेरी झुडपात गेल्या होत्या. त्या नंतर नणंद मंगला ही परतली मात्र शीतल ही दिसून आली नाही. म्हणून शोधाशोध सुरू झाल्यानंतर काटेरी झुडपात शितल ही मृत अवस्थेत आढळून आली.

पोलिसांना तपासामध्ये नणंद मंगला हिने मी शौचाहून पाच मिनिटातच परत आली असे सांगितले होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ती तब्बल २५ मिनिटांनी परत येताना दिसली. तसेच तिचा प्रियकर असल्याची माहिती मिळताच तिला विचारले, मी त्याच्याशी कधीपासून बोललेली नाही असे तिने सांगितले. मात्र सीडीआर रिपोर्ट तपासला असता ती वारंवार आणि रात्री देखील तिचा प्रियकर याचेशी बोलताना दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी मंगला घोगले हिच्यासह तिचा प्रियकर करण मोहन घटायडे. वय ३४, रा. आयोध्या नगर, बंगाली फाईल. याच्या मदतीने नणंद मंगल हिने भावजय शितलचा गळा दाबून, दगडाने डोक्यावर, हातावर व गळ्यावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली असून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!