ठरलं ! पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभे नंतर राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना यासंदर्भात संकेत दिले.
गेल्या पावणेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालात अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणीची सर्वांना प्रतिक्षा आहे. येत्या ४ जानेवारी रोजी या याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता आहे, तर आगामी तीन महिन्यांतच या निवडणुका घेण्याचे प्रयत्न असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक बूथवर दीडशे नोंदणीचे ‘टार्गेट’ असायला पाहिजे. राज्यामध्ये दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिलाय. रोजी सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते ५ जानेवारी जनतेत गेले तर ५० जणांची नोंदणी होवू शकते. काही तासांमध्येच ५० लाखांचा सदस्यांचा टप्पा गाठला जावू शकतो, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपची तयारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढील तीन महिन्यांत होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय.