जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे याचा अखेर भाजपला जय श्रीराम
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे भाजपचे नेते दिलीप खोडपे यांनी अखेर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश घेणार आहेत. जामनेर विधानसभा मतदार संघात सहा वेळा निवडून आलेले भाजपचे दिग्गज नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ते आव्हान देण्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, ३५ वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. जेव्हा पक्षाची परिस्थिती अतिशय खराब होती व टोकाचा संघर्ष करायचा होता, तेव्हा तो संघर्ष भी पक्षाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसोबत केला. मी कधीही पक्षाकडे पद अथवा लाभाची कामे मागितली नाहीत. मी आणि माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षामुळे मला ते आपसूकच मिळत गेले, तर बऱ्याच वेळेस माझे कार्यकर्ते व सहकाऱ्यांसाठी मी अनेक पदांचा त्यागही केला.
परंतु मागील दहा वर्षापासून पक्षामध्ये स्वकर्तृत्वाने मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून मोठे होण्याची स्पर्धा सुरू झाली. पक्षाच्या मूळ ध्येयधोरणापासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डावलण्यात, स्वतःचे खिसे भरण्यात, प्रत्येक गावात पक्षाचे दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यातच पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षांपासून दिसून आले. गावागावात दोन गट उभे करून आपापसातच वाद लागल्यामुळे पक्षाचेही खूप नुकसान झाले. पक्षाचे नियम व ध्येयधोरणे हे अस्तित्वातच नाहीत असे चित्र आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहे. भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर व बदलापूर येथील चिमुकलीच्या तसेच एकापाठोपाठ महाराष्ट्रभरात घडत असलेल्या बलात्कार प्रकरणात आपल्या तालुक्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही, उलटपक्षी प्रकरण सारवासारव करण्यातच सगळे प्रयत्नशील असल्याचे दिसून आले. मी या बाबतीत निषेध नोंदवला असता माझ्या बाबतीत उलट सुलट चर्चा केल्या गेल्या.
वेळोवेळी मी पक्षाच्या विविध कार्यक्रमांमधून व सभांमधून सर्व कार्यकर्त्यांसमोर पक्षात सुरू असलेली चमकोगिरी, प्रसिद्धीची हाव, कार्यकत्यांकडे होत असलेले दुर्लक्ष व पैशांना पक्षात आलेले महत्त्व या गोष्टींना उजाळा दिला. तरीही यावर कोणतीही सकारात्मक कारवाई झाली नाही. मागील अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही. हा निर्णय घेताना मला किती वेदना होत असतील याची कदाचित आजचे कार्यकर्ते कल्पना करू शकणार नाही, कारण गेल्या ३५ वर्षातला संघर्ष व त्या संघर्षातून उभे केलेले हे संघटन सोडून जाणे खूप क्लेशदायक आहे. माझ्या या प्रवासात मला एवढे मोठे करणाऱ्या माझ्या सर्व जिवाभावाच्या सहकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मी आजन्म ऋणी असेल. जामनेर तालुक्यातील जनता, माझे सर्व जिवाभावाचे सहकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवेत हजर असेल. माझा कोणत्याही नेत्यावर अथवा पदाधिकाऱ्यांवर राग किवा आकस नाही. परंतू, सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने, मूळ विचार व ध्येयधोरणांपासून जामनेर तालुक्यात स्वतःच्या डोळ्यासमोर दूर जात असलेला पक्ष याला कंटाळून, माझा स्वाभिमान जपण्यासाठी मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच सर्व पदांचा राजीनामा देत आहे. असे दिलीप खोडपे यांनी म्हटले आहे.