पिस्तूल काढतांना झाडली गेली गोळी; गुन्हा दडपण्यासाठी नादात दरोड्याचा बनाव
भुसावळ (प्रतिनिधी)। येथील खडका येथे तिन मित्र बसले असताना यातील एका अल्पवयीन मुलाने आपल्याजवळील गावठी पिस्तूल काढताना फायरिंग झाल्याने गोळी पायाला लागून मोठा रक्तस्राव झाला होता. मात्र हे प्रकरण दडपण्यासाठी दरोडा झाल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ही घटना खोटी असल्याचे स्पष्ट झाले असून, चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे, गुरुवारी रात्री १०.३० विजेच्या दरम्यान खडका येथे तिघे मित्र एका जागेवर बसले असतानाच अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्राव झाला. हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेत खडका मिलजवळ तीन संशयितांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयिताने गोळीबार केल्याची माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली. जखमीला तातडीने गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमी व त्याच्यासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकाऱ्यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले. तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला व जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी लूट झाली नसल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, साहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, साहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, अमोल पवार व कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांना लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सुरज कोळी यांना अटक करण्यात आली. संशयितांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हाताळताना गोळी सुटल्याची कबुली दिली आहे. संशयिताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीनासह वरील चार संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.