चोपडाजळगाव

चोपड्याच्या शिवसेनेच्या आमदार लताताई सोनवणे याचे जात प्रमाणपत्र रद्द

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तर त्यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचे टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध घोषित केल्याचा निर्णय नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे. समितीने या संदर्भात दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, लता सोनवणे या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे तसेच आप्तभाव संबंध परीक्षेच्या आधारे त्यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित केला. तसेच त्यांनी अमळनेर उपविभागीय अधिकार्‍यांकडे सादर केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात येत आहे.

यासोबत आमदार बनण्याच्या आधी लता सोनवणे यांनी जळगाव मनपात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडणूक लढवली असल्याने तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या आधारे देय असलेला लाभ घेतल्याने मनपा आयुक्तांनी कारवाई करावी व प्रमाणपत्र तपासणी समितीला कळवावे, असेही आदेश उपसंचालक दिनेश तिडके यांनी दिले आहे. लताताई सोनवणे यांच्याबाबत पराभूत उमेदवार जगदीश वळवी यांनी आधी न्यायालयात दाद मागितल्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. मात्र यानंतर उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला होता. आता नंदुरबार जात पडताळणी समितीने प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी याला त्या न्यायालयात आव्हान देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!