भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

धक्कादायक : पोलीसच ‘त्या’ कापूस व्यापार्‍याच्या खूनाचा मास्टरमाईंड : पाच जणांना अटक !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : पाळधीजवळ हवाल्याचे पैसे घेवून जाणार्‍या कापूस व्यापार्‍याचा लुटीच्या प्रयत्नात खून झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यात सोमवारी पाच संशयितांना अटक केली आहे. पाच संशयितांपैकी मुख्य संशयित जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी असून तोच मास्टरमाईंड असल्याचे निष्पन्न झाले आहे,

एरंडोल तालुक्यातील फरकांड येथील धनदाई ट्रेडर्सचे संचालक कापूस व्यापारी स्वप्निल रत्नाकर शिंपी हे चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.०१ ए.एल.७१२७ ने दिलीप राजेंद्र चौधरी यांना सोबत घेत जळगावातील हवाल्याच्या कार्यालयात आले होते. याठिकाणाहून दोन व्यापार्‍यांकडून दिलीप चौधरी यांनी १५ लाखांची रोकड घेतली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोकड घेवून चारचाकीने जात असतांना पाळधीजवळ दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी स्वप्निल शिंपी यांच्या चारचाकीसमोर दुचाकी आडव्या लावून कार अडविली. यानंतर स्वप्निल शिंपी यांना शिवीगाळ करत संशयितांपैकी एकाने गाडीचा दरवाजा उघडला तर दुसर्‍या चालक शिंपी यांच्या पाठीत चाकू भोसकून त्यांचा खून केला. यानंतर शिंपी याच्याकडील रोकड घेवून संशयित पसार झाले. नेमके संशयितांनी किती रोकड लांबविली हे समोर आलेले नाही. मात्र १५ लाखांपैकी काही रक्कम सुरक्षित घटनास्थळी मिळून आली. याप्रकरणी शिंपी यांच्या सोबत असलेल्या दिलीप चौधरी यांच्यामुळे ही घटना समोर आली होती. दिलीप चौधरी यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

घटनास्थळावरील वस्तुस्थिती, जळगावातील हवाल्याचे कार्यालय ते घटनास्थळ यादरम्यान सीसीटीव्ह फुटेज तसेच खबर्‍यांच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयिताबाबत माहिती काढून तपासचक्रे फिरवित अवघ्या काही तासातच जळगाव शहरातून पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या. अटकेतील संशयितांनी गुन्ह्यांची कबूली दिली आहे. अशी माहिती सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे. तसेच तपासाच्या दृष्टीने तसेच ओळख परेड बाकी असल्याने संशयितांची नावे जाहीर करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!