जळगाव मध्ये रंगपंचमीचा वाद : दोन जणांवर चॉपरने हल्ला : गुन्हा दाखल !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील तेली चौकात शिवीगाळ करत असलेल्या तरुणाला जाब विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना धारदार चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रंगपंचमीच्या वादातून घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शुक्रवारी मित्रांसोबत नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ पाण्याची टाकीजवळ रंगपंचमी खेळत होता. यावेळी पप्पू मराठे व एका दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. यावेळी नारायण कोळी याने हा वाद मिटवित तो घराकडे जात असतांना तेली चौकात पराग राजेंद्र पाटील (वय-१९) हा तरुण शिवीगाळ करीत होता. नारायण याने पराग याला शिवीगाळ का करत आहे याचा जाब विचारला याचा त्याचा राग आला. त्याने रागाच्या भरात आपल्या हातातील चॉपरने नारायण कोळी याच्यावर वार केले.
चॉपरने वार केल्याने नारायण याच्या हातावर, पाठीवर, डोक्यावर सुमारे पंधरा घाव लागले आहेत. तसेच हा वाद मिटवित असतांना नारायण याचा मित्र दीपक चौधरी उर्फ मच्छी याच्यावर देखील पराग याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. मित्रांनी जखमी नारायण कोळी याला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करीत असतांना याठिकाणी उपचारासाठी दाखल करणार्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केल्याने यात जखमी नारायण कोळी याच्यासह त्याच्या मित्राला या जमावाने मारहाण केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी नारायण याच्या फिर्यादीवरून पराग राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.