शरद कोळी यांच्यावर भाषण बंदी; शिवसैनिक आक्रमक, सुषमा अंधारेंचा मोर्चा पोलीस ठाण्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : चोपडा येथील शिवसेनेच्या महाप्रबोधन सभेपूर्वीच गोंधळ झाला. महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेले ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक वादनंतर मोठा गोंधळ उडाला सुषमा अंधारे इतर पदाधिकाऱ्यांसह पायी पोलीस ठाण्यात गेल्या. या सर्व घडामोडींमुळे जळगावातील वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या जळगावात सुरु आहे. या महाप्रबोधन यात्रेत ठाकरे गटाचे वक्ते तथा युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका करत आहेत. या दरम्यान शरद कोळी यांनी गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस सुषमा अंधारे आणि शरद कोळी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या पी प्राईड हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी कोळी यांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी पोलीस शरद कोळी यांना अटक करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद कोळी यांना पोलिसांच्या ताब्यात न देण्याचा शिवसैनिकांचा पवित्रा होता. त्यातूनच त्यांच्यात झटापट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या दरम्यान शिवसैनिक संतप्त झाल्याने पोलिसांसमवेत सुषमा अंधारे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत आणि ठाकरे गटाचे वक्ते पायी शहर पोलीस ठाण्याकडे निघाले.
शरद कोळी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्री आणि सहकार्यांवर खालच्या स्तरावरून टीका केल्या प्रकरणी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार भादंवि कलम-२९५ आणि १५३ अन्वये कोळी त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.