भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही, जिल्हा काँग्रेसचा स्वबळाचा नारा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक प्रक्रिया सुरू असतांना जिल्हा काँग्रेसने सर्वपक्षीय पॅनलवर पाणी फेरले आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सुत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत असेल तर आमची तयारी आहे. या पॅनलमध्ये भाजपाचा समावेश असुन जातीयवादी पक्षांसोबत आम्ही निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडी म्हणून आमची तयारी आहे. मात्र तसे न झाल्यास आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधली होती. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा समावेश असलेली समितीही निश्‍चित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांच्यासह आताचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा समावेश आहे. मागील आठवड्यात या समितीची बैठक होऊन भाजपा ७, राष्ट्रवादी ७, शिवसेना ५ आणि काँग्रेस २ असे जागावाटप ठरले होते. या जागा वाटपाला अंतीम स्वरूप मिळत नाही तोच जिल्हा काँग्रेसने पुन्हा एकदा कोलांटउडी घेत स्वबळाचा नारा दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. यात जे जागा वाटप झाले त्याबाबत आम्हाला कुठलीही माहिती पालकमंत्र्यांकडून देण्यात आली नाही. आम्हाला बातम्यांच्या आधारे या जागा वाटपाची माहिती मिळाली. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जिल्ह्यातही हेच सुत्र कायम ठेऊन जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून पॅनल होत असेल तर आमची तयारी आहे. जातीयवादी असलेल्या भाजपासोबत आम्ही जाणार नाही. सत्ताधारी मित्रपक्षांना आम्ही विनंती करणार असुन विनंती मान्य न झाल्यास आम्ही जिल्हा बँकेची निवडणुक स्वबळावर लढु अशी घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार परिषदेस जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष पाटील, एरंडोल विधानसभा अध्यक्ष इमरान मुश्ताक, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, चाळीसगाव आबासाहेब निकम, पारोळा तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, भडगाव शहराध्यक्ष दिलीप शेंडे, बोदवडचे दिलीप पाटील, मुक्ताईनगरचे डॉ. जगदीश पाटील, पाचोराचे सचीन सोमवंशी, मनोज सोनवणे, ज्ञानेश्‍वर कोळी, उध्दव वाणी आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!