शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांतील बनावट आरटीपीसीआर अहवाल घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आगणि रुग्णालयांमध्ये बनावट आरटीपीसीआर अहवाल घोटाळ्यात अधिष्ठात्यांनी आदेश दिल्यानंतर चोवीस तासांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडुरंग पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, तपासणी न करताच आरटीपीसीआरचा अहवाल मिळतो अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सदस्य डॉ.संदीप पटेल, डॉ. योगिता बावस्कर हे होते. समितीने चौकशी केल्यानंतर निदर्शनास आले की, निलेश भगवान पगारे, मनीष हिंमत चौधरी, अविनाश अशोक पाटील यांना नोकरीसाठी कोविड १९ चा आरटीपीसीआरचा निगेटिव चाचणी अहवाल पाहिजे असल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे यांच्याशी संपर्क केला.
त्यावेळी राजेंद्र दुर्गे याने महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कंत्राटी काम करणारे डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडुरंग पाटील याच्याशी संगनमत करून निलेश पगारे, मनिष चौधरी, अविनाश पाटील यांचे कोरोना चाचणीकरिता आवश्यक असणारे स्वाब न घेता तसेच कुठल्याही प्रकारची कोविड १९ चाचणी न करता त्यांचे मागणीप्रमाणे त्यांना बनावट आरटीपीसीआरचा निगेटिव्ह चाचणी अहवाल दिला. सदर बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून त्याचा खरा म्हणून वापर करून शासनाची फसवणूक केली आहे. चौकशी समितीने आपला अहवाल अधिष्ठाता यांना सादर केला
संशयित आरोपी स्वप्निल पांडुरंग पाटील, राजेंद्र विठ्ठल दुर्गे या दोघांनी संगनमत करून निलेश पगारे, मनिष चौधरी, अविनाश पाटील यांची कोरोना चाचणी न करता त्यांना बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल देऊन बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून त्याचा खरा म्हणून वापर करीत शासनाची फसवणूक केली आहे. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला ४२०, ४६४, ४६५, ४६६,४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय गणेश देशमुख करीत आहेत.