जळगाव जिल्ह्यात बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या चौघांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जळगाव पथकाने धरणगाव येथे छापा टाकून बनावट मद्यनिर्मिती करणाऱ्या चौघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा धावरे यांचे नेतृत्वाखाली निरीक्षक सी एच पाटील दुय्यम निरीक्षक एस. एफ. ठेंगडे, जवान एन.व्ही. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी.पाटील, के.पी.सोनवणे, राहूल सोनवणे यांच्या पथकाने शनिवारी दि.२२ जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता धरणगाव येथील भास्कर पांडुरंग मराठे यांच्या साई गजानन पार्क येथील राहत्या घरी छापा टाकला. यामध्ये बनावट मद्यनिर्मिती करत असल्याबाबत साहित्य मिळून आले आहे.
यामध्ये स्पिरिट, दारूच्या सीलबंद बाटल्यांचे दोन बॉक्स, सिलिंग मशीन, खोके तसेच दोन दुचाकी असा एकूण ११ लाख २ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. या प्रकरणी गौतम नरेंद्र माळी (वय ३२), भूपेंद्र गोकुळ पाटील (वय २९), खंडू राजाराम मराठे (वय ४०), भास्कर पांडुरंग मराठे (वय ६३) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे धरणगावात एकच खळबळ उडाली असून उत्पादन शुल्क अधिकारी तपास करीत आहेत.