भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जिल्हा बँकेत एकनाथ खडसेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी काँग्रेस मैदानात 

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजपसहित सर्व पक्षीय आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस पक्षाने वेगळा घरोबा करत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी काँग्रेसची ही खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ही घोषणा करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा बँक संचालक सुरेश पाटील, राजीव पाटील, आर. जे. पाटील, उदय पाटील आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या या भूमिकेमुळं सर्व पक्षीय आघाडीच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. संदीप पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने जिल्हा बँक निवडणूक स्वतंत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या कडे पुरेसे उमेदवार आहेत. तसेच आजही काँग्रेस पक्षाच्या विचारांचे मतदार आहेत. त्यांचा पक्षाच्या कार्यावर विश्वास आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला यश मिळेल याचा विश्वास आहे. जिल्हा बँकेत सध्या सर्वपक्षीय पॅनल आहे. मात्र शेतकऱ्यांची त्यांच्यावर नाराजी असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले नाहीत, असे उल्हास पाटील म्हणाले. 

जळगाव जिल्हा बँकेत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे अध्यक्ष आहेत. मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खडसे यांच्यावर टीका केली आहे. दुसऱ्या बाजूला आता पुन्हा भाजपसह सर्व पक्षीय पॅनल करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, आता काँग्रेस पक्षानेच वेगळा घरोबा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व पक्षीय पॅनल चे भवितव्य अधांतरी असल्याचे दिसत आहे. 

काँग्रेसकडून थेट एकनाथ खडसे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. खडसे काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असून काँग्रेसनं वेगळी भूमिका घेत खडसे यांच्या प्रयत्नांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!