जळगावला अलर्ट : जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीत तिसरी लाट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. जळगावमध्ये तसे रुग्ण नसले तरी देशातील रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता राष्ट्रीय टास्क फोर्स समितीने जळगाव जिल्ह्याला ‘अलर्ट’चा इशारा दिला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यात, दुसऱ्या लाटेपेक्षा दीडपट अधिक रुग्ण संख्येत वाढ होईल. यामुळे आरोग्य यंत्रणांना सज्जतेचा, ऑक्सिजन प्रकल्प पूर्ण करून अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
देशभरात सर्वत्र तिसरी लाट येण्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यांपासून अर्थचक्र पूर्वपदावर येत असताना ओमिक्रॉनच्या रूपात कोरोनाने रूप बदलवित पुन्हा महामारीच्या चक्राकडे वाटचाल सुरू केली आहे. ज्या नागरिकांनी लस घेतली आहे, अशांना या संसर्गाची बाधा झाली तरी ती जिवघेणी नसेल. मात्र, त्यांनी तोंडाला नेहमी मास्क वापरणे गरजेचे आहे.राष्ट्रीय टास्क फोर्स समितीच्या अलर्टनुसार तिसरी लाट जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत येण्याची चिन्हे आहेत. यात मागील लाटेपेक्षा दीडपट अधिक रुग्णांना बाधा होईल. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत १५ हजार नागरिकांना संसर्गाची लागण झाली होती. ती संख्या आता २२ हजारापर्यंत जाऊ शकते. सौम्य लक्षणे असलेल्या ६५ टक्के नागरिकांना (१३ हजार) होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल. राहिलेल्या नऊ हजार बाधितांपैकी ५० टक्के खासगी रुग्णालयात, ५० टक्के रुग्ण शासकीय रुग्णालयात भरती केले जातील. नंतर त्यांना संख्येनुसार डीसीएचसी, डीसीसीमध्ये दाखल केले जाइल. यासाठी जिल्ह्यातील सर्व ऑक्सिजन प्लांट अद्ययावत करून ते रेडी ठेवावेत, अशा सूचना आहेत. औषधसाठा, बेड मॅनेजमेंट, स्टाफ, नर्सेस इतर मदतनिसांची उपलब्धता ठेवावी असा अलर्ट आहे.
उपचार पद्धतीबाबतही मार्गदर्शनकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जशी उपचारपद्धती लागू केली होती. तशीच उपचार पद्धती तिसऱ्या लाटेतही लागू करावी. आयसीयू, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड आदी बाबींची तयार करावी, अशा सूचना आहेत.”राष्ट्रीय टास्क फोर्सच्या अलर्टनुसार तिसरी लाट जानेवारी, फेब्रुवारीत येण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ऑक्सिजन प्लांटचे कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तोंडाला मास्क लावावा, गर्दीत जाणे टाळावे. यामुळे ओमिक्रॉन संसर्गाच्या बाधेपासून सुरक्षित रहाल.”- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक