जळगाव पोलिसांकडून दिवसाआड दुचाकी चोरट्याचा पर्दाफाश; 10 दुचाकी जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील गोलणी मार्केटमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. हे चोरटे एक दिवसाआड दुचाकी चोरायचे. एक दिवसाआड दुचाकी चोरणाऱ्या या चोरट्यांचा जळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत.
जळगाव पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पोलीस नाईक भास्कर ठाकरे या दोघा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. दुचाक्यांची चोरी
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या महिनाभरात अनेक दुचाकींची चोरी होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे पथकातील कर्मचार्यांचे पथक तयार केले होते.
गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आणि पाेलीस नाईक भास्कर ठाकरे या दोघांना दुचाकी चोरटे नेहमीप्रमाणे चोरी करण्यासाठी मार्केटमध्ये आल्याची पक्की खबर मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून संशयित इब्राहीम मुसा तांबोळी,वय-26 रा.तोंडापूरता, जामनेर, याला शहरातील गोलाणी मार्केटमधून अटक केली. पोलिसांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने 15 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. त्या चोरट्याकडून 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.