राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडावा – जळगाव जुक्टोची शासनास आर्त हाक
कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी l राज्यातील कनिष्ठ माध्यमिक शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय मागण्या आज अखेर देखील शासनाकडून सोडविल्या जात नसल्याने राज्यातील कनिष्ठ अधिकारी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार राज्य महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना लेखी, तोंडी आश्वासने देऊन देखील त्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याकारणाने उद्या संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी तथा तहसीलदार महोदयांना कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशान्वये संबंधित जिल्हा संघटनांच्या वतीने निवेदन देऊन एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.
त्या आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आज दि. 16 मार्च रोजी जळगाव येथे नाशिक विभागाचे पदवीधर आमदार मा.सत्यजित तांबे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता राज्य महासंघाच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आमदार महोदयांना घेराव घालून आपल्या प्रलंबित मागण्यांचे लेखी निवेदन दिले.
या मागण्यांमध्ये प्रामुख्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासकीय/ निमशासकीय सेवेत दाखल झालेल्या अर्थवेळ,विना,अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी व सेवानिवृत्त शिक्षकांना
याचा लाभ घेण्यात यावा. तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. 10,20,30ही आश्र्वासित प्रगती योजना शिक्षक संवर्गास त्वरीत लागू करण्यात यावी, आयटी विषय शिक्षकांच्या समायोजनाचे तात्काळ आदेश काढावेत, प्रलंबित वाढीव पदांवरील शिक्षकांचे तातडीने समायोजन करण्यात यावे विना अट सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी या व इतर प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा. नंदन वळींकार,जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, उपाध्यक्ष डॉ.अतुल इंगळे, गजानन वंजारी, प्रमिला सोनवणे, माधुरी पाटील, एकता कवटे, सुधाकर ठाकूर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आ.तांबे यांना समस्यांविषयी अवगत करताना शासनाने आजवर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिलेली असून आजवर झालेल्या कोणत्याही आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. याउलट कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेला नेहमीच उपेक्षित ठेवलेले आहे असा आक्रमक विचार मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या व सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात याबाबत विधिमंडळात आवाज उठविण्याचे साकडे घातले. आ.तांबे यांनी शिक्षकांच्या समस्यांची उकल करण्यासाठी नक्की प्रयत्न करतो, व व्यक्तिशः सदैव शिक्षकांसोबत आहे असे आश्वस्त केले
.याप्रसंगी प्रा.नंदन वळींकार,प्रा.सुनील गरुड, प्रा.गजानन वंजारी, प्रा.प्रदीप पाटील,डॉ.अतुल इंगळे, प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा.स्मिता जयकर, प्रा.धनराज भारुडे, डॉ.संदीप पाटील, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.प्रमिला सोनवणे, प्रा.एकता कवटे, प्रा.माधुरी पाटील,प्रा.ललित सुपे,प्रा.किरणकुमार पाटील आदी उपस्थित होते.